मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मुंबई येथील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात होणाऱ्या सभेत बरेच काही बोलण्याची शक्यता आहे. आजच्या सभेत काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या या सभेबाबत आणखी उत्कंटा वाढवली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज (14 मे) म्हटले की, आजचा दिवस हा क्रांतीकारक असेल. त्यांनी या आशयाच एक ट्विटही केले आहे. ज्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शायरीच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है.., अंदाज हमारा!, जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!' असे म्हणत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आजच्या सभेतून मुख्यमंत्री विरोधकांना जशास तसे उत्तर देतील, असे संकेतच संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Political Meeting Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा; भोंगा, हिंदुत्व आणि भाजप, मनसेवर बोलण्याची शक्यता)
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शिसेनेची सभा म्हणजे नेहमीच दमदार असते. आम्हाला सभेसाठी माणसे आणावी लागत नाहीत. ती जमतात. आजची सभा तर क्रांतीकारी असेल. ती भव्यदिव्य असेल. शिवसेनेचे सगळेच भव्य असते. अशी चौफेर फटकेबाजी संजय राऊत यांनी सभेपूर्वीच केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून या सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली जात असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या या सभेचे सोशल मीडियातून टीझरही जोरदार लॉन्च करण्यात आले आहेत.
ट्विट
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान में दुबारा:
कूछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा!!!
जय महाराष्ट्र!
आज क्रांतिकारी दिवस!! pic.twitter.com/G9SHBuIdU0
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 14, 2022
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारची जाहीर सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले आणि काही काळातच कोरोना व्हायरस महामारी आली. त्यामुळे लॉकडाऊन लागला आणि सर्वच जाहीर कार्यक्रमावर मर्यादा आल्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध हटवले आहेत. परिणामी रखडलेल्या निवडणुका पार पडणार आहेत. सहाजिकच राजकीय पक्षांमध्ये राजकीय ज्वर भरला आहे.