Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुंबई येथे जाहीर सभा घेत आहेत. ही सभा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) येथे पार पडत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वैचारिक प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे येत्या 14 मे रोजी मी जाहीर सभेत थोडा मास्क काढून बोलणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानुसार ही सभा आज पार पडते आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक पार पडते आहे. त्यामुळे या सभेतून (CM Uddhav Thackeray Political Meeting Today) शिवसेना (Shiv Sena) पक्षाला इलेक्शन मोडवर नेण्याचे कामही मुख्यमंत्री पक्षप्रमुख म्हणून करतील. शिवसेनेकडून या वेळी मोठे शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारची जाहीर सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले आणि काही काळातच कोरोना व्हायरस महामारी आली. त्यामुळे लॉकडाऊन लागला आणि सर्वच जाहीर कार्यक्रमावर मर्यादा आल्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध हटवले आहेत. परिणामी रखडलेल्या निवडणुका पार पडणार आहेत. सहाजिकच राजकीय पक्षांमध्ये राजकीय ज्वर भरला आहे. (हेही वाचा, BJP On Shivsena: मुख्यमंत्र्यांच्या 14 मे रोजी होणाऱ्या मेळाव्याआधी भाजपकडून टीका करणारे व्यंगचित्र शेअर)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोणाचा समाचार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपने रान उठवले आहे. दुसऱ्या बाजूला हिंदुत्व, हनुमान चालिसा यावरुनही राजकारण तापले आहे. प्रामुख्याने मनसेने मशिदींवरील भोंग्यावर जोरदार भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तिजाय जलीली यांनी डोके ठेवले. या सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतून जोरदार प्रसिद्धी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे टीझर जोरदार लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.