मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि एकूणच ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोपांची मालिका लावणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि इतर भाजप नेत्यांना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जुनी थडगी उकरु नका. जुनी थडगी उकरुन काही हाती लागत नसते. जर आम्हीही जुनी थडगी उकरायचे ठरवले तर त्यात आमच्यापेक्षाही अधिक तुमचेच सांगाडे सापडतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांच्या बद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले. सोमय्या यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. आपल्याच कृतीमुळे आपलाच पक्ष गाळात जात आहे. पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. उगाचच खोटेनाटे आरोप करत बसू नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे दिवळीनिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Anil Parab On Kirit Somaiya: दिवाळी संपू देत किरीट सोमय्या यांच्या आरोपांना एकदाच 'शिवसेना स्टाईल' उत्तर देऊ- अनिल परब)
राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. काहींनी अघोरी प्रयत्न करुन पाहिले. सरकार पाडण्याचे अनेक दावे करण्यात आले. परंतू, सरकार स्थिर आहे. सरकारला साधे खरचटलेही नाही. इतकेच नव्हे तर पुढेही हेच सरकार पाच वर्षे चालेल आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच चालेल, असेही संजय राऊत यांनी ठासून सांगितले.
महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेले वर्षभर जनकल्याणाची कामे करत आहेत. यापुढेही ते असेच काम करत राहतील. हे सरकार आपले आहे. असे राज्यातील जनतेला, प्रत्येक नागरिक आणि घटकाला वाटायला पाहिजे. त्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.