File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) हे भाजपच्या दबावाखाली काम करत आहे असा पुनुरुच्चार करत राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारचे अनेक निर्णय रखडले आहेत असा आरोपही केला. या वेळी त्यांनी राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात शीतयूद्ध नव्हे तर थेट खुलं वॉर सुरु असल्याचेही सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष, शेतकरी आंदोलन यांसह विविध मुद्द्यांवर संजय राऊत यांनी या वेळी भाष्य केले. राज्यपाल हे भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. राजभवनाचा वापर हा राज्याच्या हितासाठी व्हायला हवा मात्र तो वापर राजकीय कारणांसाठी होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

राज्य सरकारने आणि राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी स्वीकारणे हे राज्यपालांचे घटनात्मक काम आहे. तसे करणे त्यांच्यावर बंधनकारक असल्याचे राज्य घटना सांगते. असे असतानाही राजपाल हे राज्य मंत्रिमंडळाने सर्व नियमांत बसत असलेली राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची शिफारस केली असताना राज्यपालांनी अद्याप ती फाईल लटकवून ठेवली आहे. याचा अर्थच असा की राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे हे युद्ध हे शितयुद्ध नव्हे तर खुलं वॉर आहे असे संजय राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, Sanjay Raut Criticizes Devendra Fadnavis: अहंकारी शब्दावरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला; काय म्हणाले? वाचा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांना 'आंदोलनजीव' हा शब्द वापरला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले. आज भाजप सरकारमध्ये आहे. त्यामुळे तो आंदोलनाला विरोध करत आहे. उद्या भाजप सत्तेतून बाहेर गेला तर हाच भाजपा रस्त्यांवर सरकारविरुद्ध आंदोलन करेल. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. आंदोलनं ही लोकशाही देशात अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्या देशात हुकूमशाही किंवा लष्करशाही नाही. ज्या देशात हुकूमशाही, लष्करशाही आहे त्या देशातही लोक रस्त्यांवर उतरुन आंदोलन करत असल्याचे राऊत म्हणाले.