जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) हिसांचाराच्या निषेधार्थ विद्यार्थांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) आंदोलन सुरु केली होती. यातच गेट वे ऑफ इंडियाजवळील परिसरात आंदोलन करणाऱ्यांपैकी एका तरुणीच्या हातात फ्रि काश्मीर (Free kashmir) पोस्टर आढळल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. या वादात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही उडी घेतली असून फ्रि काश्मीर पोस्टरसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जेएनयू विद्यापीठातील हिंसाचाराच्या विरोधात देशभरातून निषेध दर्शवला जात आहे. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथील परिसरात काही विद्यार्थ्यांनी अंदोलन केली होती. त्यावेळी एका तरुणीने फ्रि काश्मीर असे मजकूर लिहिलेले पोस्टर आपल्या हातात धरले होते. या पोस्टरबाजीमुळे राजकारण तापले असून अनेक राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. हे देखील वाचा-केंद्र सरकारच्या चिथावणीमुळेच जेएनयूतील विद्यार्थांवर हल्ला- सोनिया गांधी

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

फ्रि काश्मीर अर्थ संबंधित व्यक्तीने सांगितल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. फ्रि काश्मीरचा अर्थ निर्बंधांमधून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधामधून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी अंदोलक तरुणी करत असल्याचे माझ्या वाचनात आले होते, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच काश्मीरला भारतापासून मुक्त करा असे कोणी म्हणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

एनआयचे ट्वीट-

किरीट सोमय्या काय म्हणाले?

गेट वे ऑफ इंडिया येथे सोमवारी निषेध करताना दिसलेल्या 'मुक्त काश्मीर' या पोस्टरवर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. मी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मला चौकशीचे आश्वासन दिले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांचे ट्वीट-

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थांना एका जमावाने मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 50 लोकांचा घोळका विद्यापीठाच्या परिसरात घुसला आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घोळक्याने वसतिगृहांची तोडफोड देखील केली होती. यावर राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारांनीही निषेध नोंदवला होता.