एमआयएम (MIM) खासदार इम्तिजाय जलील (AIMIM,Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकासआघाडी सरकारला युतीची ऑफर दिली आहे. यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून जोरदार टीकाही केली आहे. एमआयएम पक्षासोबत युती हा विचारही एक गंभीर आजार आहे. राज्यात महाविकासआघाडी भक्कम आहे. जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. जाऊन गुडघे टेकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचा विरोधकच आहे, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut on MIM) यांनी टीकास्त्र सोडले आहे.
एमआयएम हा पक्ष म्हणजे भाजपची 'टीम बी' आहे. उत्तर प्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय आला आहे. देशभरात होणाऱ्या निवडणुकांमधून हे दिसून येते. त्यामुळे महाविकासआघाडीसोबत युती हा विचार तरी मनात येतो कसा? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एमआयएमसोबत उघड किंवा छुपी युती करण्याचा प्रश्नच नाही. काही लोकांची अशी छुपी युती आहे पण ती त्यांची त्यांनाच लखलाभ, असे म्हणत राऊत यांनी भाजपलाही टोला लगावला. (हेही वाचा, MIM Offers TO NCP: एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर, समिकरण जुळणार का? राज्याच्या राजकारणात नवी चर्चा)
दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकासआघाडीमधील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. ते आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे आमदार भाजपमध्ये येतील असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते या वक्तव्याचा जोरदार समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. काल होळी होती. त्यामुळे त्यांनी भांग किंवा नशा करुन हे वक्यव्य केले की काय माहिती नाही. राज्यात महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. त्यांनी काळजी करु नये. काल होळी संपली आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांना विचारले तर कदाचित त्यांना त्यांनीच केलेले वक्तव्य आठवणारही नाही, असे राऊत म्हणाले.