
Sharad Pawar Interview by Sanjay Raut: शिवसेना (Shiv Sena) खासदार, दै. सामना (Daily Saamana) संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील आणि त्याचसोबत देशाच्याही राजकीय वर्तुळातील उत्सुकता वाढवली आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अद्याप प्रकाशित झाली नाही. मात्र, ही मुलाखत अत्यंत जोरदार झाली असून, देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल अस दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.
संजय राऊत हे शिवसेना खासदार आहेत. मात्र, त्यासोबतच ते शिवेसना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना या वृत्तपत्राचे संपादकही आहे. गेली प्रदीर्घ काळ ते सामना वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांनी सामना वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विविध व्यक्तीमत्वांच्या मुलाखती या आधीही अनेक वेळा गाजल्या आहेत. खास करुन शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. राज्यातील आणि देशातील तत्कालीन अनेक ज्वलंत विषयांवर बाळासाहेब ठाकरे यांची मत सामना दैनिकासाठी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रसिद्ध होत. ज्यामुळे राज्य आणि देशभरात चर्चा होई.
आजही संजय राऊत सामनासाठी मुलाखती घेतात. प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीही राऊत यांनी अलिकडे अनेकदा घेतल्या आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, सध्याचे युग हे डीजिटल असल्याने या मुलाखती आता इंटरनेट आणि युट्युबसारख्या इतर माध्यमांतूनही प्रसारित होता. त्यामुळे त्या मुद्रीत आणि ध्वनीचित्रमुद्रीत पद्धतीनेही पाहता येतात. (हेही वाचा, शरद पवार, संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी व्यक्त केली नाराजी)
देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. pic.twitter.com/pTdCKucP0n
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2020
दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार मुलाखती दरम्यान कोणकोणत्या विषयावर बोलले याचा तपशील मात्र गुलदस्त्यातच ठेवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुता वाढली आहे. सर्वांना प्रतिक्षा आहे ती मुलाखत कधी प्रसिद्ध होते याची.दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. शरद पवार हे चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले'' आहेत.