शरद पवार, संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी व्यक्त केली नाराजी
Sharad Pawar,PM Modi,Sanjay Raut | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. या वेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांना बिनशर्थ पाठिंबा दिला. दरम्यान, राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे प्रशासकीय कामात हस्तक्षेप करत असल्याचेही पवार आणि राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा नामोल्लेख टाळत शरद पवार म्हणाले की, राज्यपालांना जरुर अधिकार आहेत. पण, त्या अधिकारांचा वार करुन त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर, त्या त्यांनी मुख्यमंत्री अथवा राज्याच्या मुख्य सचिवांद्वारे द्याव्यात. माझ्या ऐकण्यात आले आहे की, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना सूचना न करता थेट नोकरशाहीलाच सूचना दिल्या जात आहेत. राज्याची सर्व सूत्रे ही मुख्यमंत्र्यांच्याच हातात असायला हवीत. कोणत्याही स्थिती अधिकारकेंद्रं टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिकाही पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावल्याबद्दल भारताने दिलेल्या प्रतिक्रियेचा मुद्दा शिवसेनेने मोदींकडे उपस्थित केला. तसेच, देशाचे नेतृत्व पंतप्रधान आणि राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री यांच्याकडेच असायला हवे, याबाबतही शिवेसनेने पंतप्रधानांकडे भूमिका व्यक्त केली असे, वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि विरोधी पक्षांच्या सूचना यांवर मोदींनी विरोधकांशी चर्चा केली. या वेळी देशभरात लावलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनबाबत सरकारने सिंहावलोकन करावे. राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला. कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठी त्याचा किती फायदा झाला हे केंद्र सरकारने तपासून पाहावे, असे पवार म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच होणार आमदार; घटनात्मक पेच टळला तर सरकार वाचणार)

पुढे बोलताना पवार म्हणाले की,  केंद्र सरकारने आपल्या खर्चांवर आळा घालावा. फालतू गोष्टींवर खर्च होत असेल तर तो टाळावा. सरकारने विना नियोजित खर्चावर आळा घालणे आवश्यक आहे. एनडीए सरकारने नवीन संसद इमारत बांधण्याच्या आपल्या योजनेवर पुनर्विचार करावा. तसेच, तो विचार पुढे ढकलावा अशी सूचनाही शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली.

निजामुद्दीनच्या घटनेमळे कोरना व्हायरस रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली. परंतू, तरीही त्या निमित्ताने एकाद्या समूहाला लक्ष्य करणे योग्य नाही. ते आटोक्यात आणण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही पवार या वेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांना राज्य सरकारकडून माहिती घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ते कोणत्याही विषयाची, कोणत्याही वेळी माहिती घेऊ शकतात, असे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.