Shiv Sena on BJP: मोदी मोदी करुनही भाजपला माती खावी लागली- शिवसेना
Shiv Sena | (File Photo)

देशभरातील विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीतील (Assembly and Lok Sabha by-election) निकालावरुन शिवसेनेने भाजपवर (Shiv Sena on BJP) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मोदींचा चेहरा पुढे करुन शिवसेनेने 18 खासदार निवडून आणल्याचा दावा करणाऱ्या भाजपला शिवसेनेने मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून फटकारले आहे. दादरा- नगर हवेली (Dadra And Nagar Haveli) लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचा विजय बरेच काही सूचीत करणारा आहे. दादरा व नगर हवेली आणि देगलूर येथील पोटनिवडणुकीचा निकाल पाहता 'मोदी मोदी करुनही भाजपला माती खावी लागली' असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

'फटाके फुटलेच आहेत, शिवसेनेची दिवाळी' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात शिवसेनेने म्हटले की, 'ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. मोहनभाई डेलकर हे दादरा-नगर हवेलीचे लोकनेते होते. सात वेळा ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. या संपूर्ण भागावर त्यांचा प्रभाव होता हे नक्कीच. ते हिंमतबाज लढवय्ये होते, पण केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या सनकी तानाशाही कार्यपद्धतीस विरोध करणाऱ्या डेलकरांना मानसिक ताणतणाव असह्य झाला व शेवटी मुंबईत येऊन त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला'. (हेही वाचा, Shiv Sena on BJP: त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा; शिवसेनेचे भाजप, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र)

दादरा व नगरहवेली लोकसभा पोटनिवडणूक निकालावरुन शिवसेनेने पुढे म्हटले आहे, 'सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती. डेलकर यांच्या आत्महत्येने फक्त दादरा-नगर हवेलीचीच जनता नव्हे, तर महाराष्ट्र-गुजरातला धक्का बसला. डेलकर कुटुंब त्या धक्क्यातून सावरेल काय? हा प्रश्न होताच, पण शेवटी शिवसेनेच्या आधारात डेलकर कुटुंब आणि तेथील जनता अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाली. त्याच लढ्याची पहिली ठिणगी म्हणून कलाबेन डेलकर यांच्या विजयाकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. कलाबेन डेलकर या 51,269 इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. हा विजय ऐतिहासिक आहे'.

'मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक देईल. दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱयांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत. दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत', अशीही टोलेबाजी शिवसेनेने केली आहे.