Gokul Dudh Sangh, Kolhapur | (Photo Credit: http://www.gokulmilk.coop)

गोकुळ दूध संघ (Gokul Dudh Sangh, Kolhapur) मुख्य कार्यालयावर शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी धडक मोर्चा काढला. पशुखाद्याचे वाढीव दर कमी करावेत या मागणीसाठी शिवसैनिकांनी गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसैनिकांनी काढलेला मोर्चा दूध संघ कार्यालयाच्या फाटकावर आडविण्यात आला. मात्र, काही संतप्त शिवसैनिकांनी फाटक तोडून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही काळापासून गोकुळ दूध संघाने आपल्या ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले होते. या वाढत्या दरांची झळ पशू मालक शेतकऱ्यांना थेट बसत होती. त्यामुळे हे दर कमी व्हावेत अशी शेतकऱ्यांचीच मागणी होती. शेतकरी आणि पशू मालकांची मागणी शिवसेनेने लाऊन धरली होती. शिवसेनेने गोकूळ दूध संघ कार्यालयाकडे याबबत माहिती दिली होती. मात्र, अनेकदा सूचना करुनही गोकूळकडून या मागणीला विशेष महत्त्व देण्यात आले नव्हते. परिणामी शिवसेनेने धडक मोर्चा काढून आंदोलन केले. (हेही वाचा, गोकूळ दूध संघावर आयकर विभागाचा छापा, सहकार क्षेत्रात खळबळ)

सध्याचे पशुखाद्य दर योग्यच आहेत अशी भूमिका दुध संघाने घेतली होती. मात्र, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत या दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान, शिवसेना नेते आणि आंदोलक यांची आणि गोकूळ दूध संघ व्यवस्थापण यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पशुखाद्याचे दर कमी करण्याबाबत विचार करण्यात येईल असे अश्वासन देण्यात आल्याचे समजते.