Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवल्या तेव्हा संप्रदाय बदनाम नाही झाला का? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad | (Photo Credits: Facebook)

रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मांसाहार करा असे विधान बुलढाणा येथील शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायवकाड ( Shiv Sena MLA Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदयातील काही मंडळींना भलताच राग आला आहे. त्यामुळे या संप्रदयातील महाराज असलेल्या एका व्यक्तीने आमदार संजय गायकवाड यांना फोनद्वारे जाब विचारला. या वेळी हिंदुत्व आणि धर्म यावरुन जाब विचारणाऱ्या या महाराजांना आमदार गायकवाड यांनी चांगलेच खडसावले. जेव्हा तुमच्या महाराजांनी मंडपातून बायका पळवल्या तेव्हा संप्रदाय, धर्म धोक्यात आले नव्हते का? असा सवालही गायकवाड यांनी या महाराजांना केला. आमदार गायकवाड यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत महाराज असल्याचे समजते. प्रशांत महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील कथीत फोन संभाषणाची एक ऑडीओ क्लिप ( Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Viral Clip) सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. लेटेस्टली मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

काय आहे प्रकरण?

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी 'रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर अंडे,मटन खा. कोरोना काळात देवही वाचवायला येणार नाही' असे म्हटले होते. आमदार गायकवाड यांचे हे वक्तव्य वृत्तपत्रातही छापून आले. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्या विधानवर वारकरी संप्रदायातील काही लोक नाराज झाले. त्यातील काहींनी आमदार गायकवाड यांना फोनही केले. त्यातील प्रशांत महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील कथीत फोन संभाषणाची एक ऑडीओ क्लिपही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य म्हणाले “करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते”)

हिंदुत्व आणि धर्मशास्त्रावरुन जाब विचारणाऱ्या महाराजाला झापताना संजय गायकवाड यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी महाराजांना विचारले की, नॉनवेज खाण्याचे आवाहन केल्यानं हिंदुत्व संपतं का? तुमच्या महाराजांनी मंडपातून बायका पळवून नेल्या, तेव्हा वारकरी सांप्रदायाची बदनामी नाही होत का? मुस्लिम दोन टाईम नॉनव्हेज खातात म्हणून त्यांच्यात मरणाचं प्रमाण कमी आहे, असं मी म्हटलं होतं. मी हे विधान माझ्या कार्यकर्ता, चाहत्यांसाठी केले होते. जो माझा चाहता आणि समर्थक नाही, त्याला अंगावर घ्यायचं कामच नाही. धर्म वगैरे काही नाही, जगला तर धर्म आहे. नाहीतर गेला ***. कीर्तन करणं एवढंच हिंदुत्व असतं का?, आमच्यासारख्या तुम्ही तलावारी झेलल्यात का? की दंगलीमध्ये रक्त सांडलं तुम्ही, हिंदुत्वाचा आम्हाला शहाणपणा शिकवू नका, फोन ठेव, असे म्हणत संजय गायकवाड यांनी प्रशांत महाराज नामक व्यक्तीला झापलं.

दरम्यान, या आधीही आमदार संजय गायकवाड जोरदार चर्चेत आले होते. मागच्या वेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आपल्याला जर कोरोनाचे जंतू मिळाले तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबेन असे वक्तव्य केल्याने संजय गायकवाड हे चर्चेत आले होते.