आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते, तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेल्या अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. नुकतीच टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल आणि विभाग प्रमुखांची एक बैठक संपन्न झाली. यावेळी अशोक शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यमंत्रीपद देखील भूषवले आहे. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हे देखील वाचा- Maharashtra Flood Relief: पूरग्रस्तांबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक
ट्वीट-
माजी राज्यमंत्री व हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अशोक भाऊ शिंदे यांनी आज कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
अशोक शिंदे जी यांचे अभिनंदन. pic.twitter.com/RYEO5Zra7W
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 3, 2021
अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पक्षात प्रवेश घेणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. अशोक शिंदे यांच्या प्रवेशाने हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल असे म्हणत पटोले यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे. तसेच अजूनही विविध पक्षातील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशोक शिंदे हे शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसेच वरिष्ठ नेतेमंडळीकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी शिवसेना सोडचिठ्ठी देत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असेही बोलले जात आहे.