ठाणे जिल्ह्यात (Thane District) खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिवंगत शिवसेना नेत्याच्या पत्नीने कारागृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैशाली निमसे (Vaishali Nimse) असे या महिलेचे नाव आहे. कल्याण (Kalyan) येथील आधारवाडी कारागृहात (Adharwadi Jail ) असलेल्या शौचालयात तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथामिक वृत्त आहे. दरम्यान, वैशाली हिने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारण आहे याबाबत पोलीस तपास करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैशाली हिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजते. पती शैलेश निमसे (Shailesh Nimse) यांच्या हत्या प्रकरणात तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, वैशाली ही शैलेश निमसे यांच्या पत्नी होती. शैलेश निमसे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि शहापूर तालुक्याचे माजी उपतालुकाप्रमुख होते. एप्रिल 2018 मध्ये त्यांची अज्ञातांनी हत्या केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या इतर कोणी नव्हे तर, निमसे यांची पत्नी वैशाली हिनेच केल्याचे पुढे आले. पोलिसांनी या हत्या प्रकरणात वैशाली हिच्यासह अन्य दोघांना अटक केली होती. सध्या तिची रवानगी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. तिच्या आत्महत्येमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा, धक्कादायक! नवी मुंबईत लॉजमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या)
शैलेश निमसे हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले की, शैलेश आणि वैशाली निमसे यांच्यात सातत्याने वाद होत. शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या महिलेसोबत ते विवाह करणार होते. पत्नी वैशाली आणि शैलेश यांच्यात वादाचे हेच प्रमुख कारण होते. वैशाली हिला मारहाण करुन तिच्या नावावर केलेली मालमात्ताही शैलेश यांनी आपल्या नावे करुन घेतली होती. या सर्व प्रकारातून निर्माण झालेल्या रागातून वैशाली हिने पती शैलेश निमसे यांच्या हत्येची सुपारी दिली. त्यासठी तिने पतीच्या हत्येचा कट एक महिन्यापूर्वीच रचला.