Sanjay Raut (Photo Credit - PTI)

यापूर्वी पाठ्यक्रमात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असं घोषवाक्य होतं. मात्र, आता ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें,’ असा प्रकार भाजपने (BJP) बिहारमध्ये चालवला आहे. बिहार निवडणूकीच्या (Bihar Election 2020) पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील नागरिकांना सरकार आल्यास सर्वांना मोफत कोरोना लस ( COVID Vaccine) देण्यास आश्वासन दिलं आहे. भाजपच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जहरी टीका केली आहे. केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाचं कोरोनाची लस मोफत मिळणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. भाजप अशा प्रकारचे आश्वासन देऊन देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपदेखील राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात भाजपने आपले सरकार आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असं आश्वासन दिलं आहे. या आश्वासनावरून संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज प्रसारमाध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या या आश्वासनावर जोरदार टीका केली आहे. (हेही वाचा - Balasaheb Thorat on BJP: बिहार मधील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे भाजपकडून जाहीर; बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राबद्दल उपस्थितीत केला 'हा' प्रश्न)

यासंदर्भात प्रसारमाध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, ज्या राज्यात भाजप सरकार नाही, त्या राज्याला कोरोनाची लस मिळणार नाही का? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. जेव्हा शाळेत जायचो तेव्हा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, अशी घोषणा होती. मात्र, आता तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे, अशी घोषणा दिली जात आहे. त्यामुळे बिहारमध्ये दुसऱ्या पक्षाला मत दिलं, तर त्यांना लस मिळणार नाही. याशिवाय मध्य प्रदेशातही असंचं आश्वासन दिलं जात आहे. भाजप कोरोना लसीच्या मुद्द्यावरून देशाची विभागणी करण्याची तयारी करत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

भाजपने बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोरोना मोफस लसीच्या वाटपावरून दिलेल्या आश्वासनामुळे राजकारण प्रचंड तापलं आहे. अद्याप कोरोनाची लस आलेली नाही. परंतु, तरीदेखील लसीच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यात येत आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला हवी. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील नागरिकांना कोरोनाची लस मिळणार नाही का? असा सवाल शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील केला आहे.