लोणावळा (Lonavla) शहर खूनाच्या घटनामुळे हादरलं आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी (Rahul Shetty) यांची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. राहुल शेट्टी हे शिवसेनेचे मावळ तालुका संस्थापक प्रमुख दिवंगत उमेश शेट्टी यांचे पुत्र होते. याशिवाय लोणावळ्यात आणखी एक हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत मृत झालेल्या युवकाचं नाव गणेश नायडू असं आहे. गणेश नायडू या तरुणाचा रविवारी रात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे लोणावळा शहरात एखच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राहुल शेट्टी आज सकाळी त्यांच्या घराजवळ असलेल्या चहा स्टॉलवर चहा पित होते. यावेळी त्यांच्यावर मारेकऱ्यांनी तीन गोळ्या झाडल्या तसेच धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत राहुल शेट्टी रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. राहुल शेट्टी यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ शहरातील रुग्णालयात दाखळ केले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Pashankar Auto चे संचालक गौतम पाषाणकर 9 दिवस उलटले तरीही बेपत्ता, पत्नीने घरी परतण्यासाठी घातली साद)
दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी राहुल शेट्टी यांच्या वडिलांचीदेखील अशाचं प्रकारे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई मुलगा व मुलगी असे कुटुंब आहे. विशेष म्हणजे राहुल शेट्टी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे शहर पोलिसांना सांगितले होते. मात्र, आज त्यांच्यावर मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला असून यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लोणावणळा पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली असून राहुल शेट्टी यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय लोणावळ्यात रविवारी गणेश नायडू या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. यातील हल्लेखोर पसार झाला असून एक हल्लेखोर गंभीर जखमी झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.