Nitin Nandgaonkar Receives Death Threats: शिवसेना पक्षाचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी
Nitin Nandgaonkar (Photo Credit: Twitter)

शिवसेना (Shiv Sena) नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात आता नितीन नांदगावकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोनवरुन धमकी दिली आहे. तसेच शिवीगाळदेखील केली आहे, असेही त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. नितीन नांदगावकर हे आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ते मनसेत होते. मनसेतून त्यांनी ऑगस्ट महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना रुग्णाला अवाजवी बिल दिल्यामुळे पवई येथील हिरानंदानी रुग्णालया विरोधात अंदोलन केले होते. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केली असून त्यांच्या अंगावर धावून गेल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नांदगावकर यांना सोमवारी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर नितीन नांदगावकर यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसांपूर्वी मी शिवसेनेच्यावतीने हिरानंदानी रुग्णालयात जाऊन एका रिक्षाचालक कोरोना रुग्णाला दिलेले बिल कमी करण्याबाबत तसेच मृतदेह ताब्यात देण्यात जाब विचारला होता. त्यावेळी माझा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता. सदर हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चटर्जी यांना जाब विचारला असता त्यांनी मला दम देत सांगितले की आठ लाख भरा व मृतदेह घेऊन जा. पण मी त्यांना एकही रुपया भरणार नाही व मृतदेह घेऊन जाणार नाही असे सांगून रिक्षा चालकाचा मृतदेह घेऊन आलो. त्यानंतर सोमवारी माझ्या मोबाइलवर 996719933 या क्रमांकावरुन फोन आला आणि मला शिव्या देण्यात आल्या. तुम्हारे साथ क्या होगा समझ जाओगे, अशीही धमकी देण्यात आली. असे नितीन नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे देखील वाचा- अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या पाठोपाठ आता सविता मालपेकर सुद्धा हाती बांधणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ

नितीन नांदगावकर यांनी याआधी अनेक प्रकरणे आपल्या अंदाजात मार्गी लावले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दादर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांकडून अधिक पैसे उकळणाऱ्या टॅक्सी किंवा रिक्षाचालकांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. यापूर्वी माटुंगा रेल्वे स्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता. नितीन नांदगावकर यांनी या छेड काढणाऱ्या तरुणाला शोधून काढले आणि चांगलाच चोप दिला होता.