![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Eknath-Shinde-380x214.jpg)
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोरोनावर (COVID-19) मात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी एक आठवड्यापूर्वी स्वतः ट्विट करुन त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ शिंदे यांची लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या समर्थकांनी होमदेखील केला होता. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे, समाज उपयोगी काम अडून राहू नयेत म्हणून त्यांनी रुग्णालयात असतानाही आपले सुरु ठेवले होते. यामुळे अनेकांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 24 सप्टेंबर रोजी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट्स घालून रुग्णालयांची पाहणी केली होती तरीही त्यांना करोना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. हे देखील वाचा- Jitendra Awhad Criticizes Opposition: महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे 'मराठी भैय्ये' आता माफी मागणार का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता हे सर्वजणांनी कोरोनावर मात केली आहे.