'शिवबंधन वगळता माझ्याकडे सोडण्यासारखे काहीच नाही', शिवसेना नेते दीपक सावंत यांचे सूचक विधान
Deepak Sawant | (Photo Credits-Facebook)

महाविकाआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , राष्ट्रीय काँग्रेस (Congress) अशा सत्ताधारी तिन्ही पक्षांसह विरोधातील भाजप नेत्यांच्या मनातील नाराजी डोके वर काढत आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच मोठ्या पक्षांमधील असे चित्र असताना त्यातील काही नेतेच आपली नाराजी उघड करताना दिसत आहेत. अशा नेत्यांमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिलेले शिवसेना नेते दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या नावाचीही भर पडली आहे. 'आपल्याकडे पक्षाचे कुठलेही पद नाही, त्यामुळे हातातील शिवबंधन (Shivbandhan) वगळता सोडण्यासारखे आपल्याकडे काहीही नाही' असे म्हणत दीपक सावंत यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

दीपक सावंत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत विधान केले की, 'गेले दीड वर्ष मी पक्षाकडे काम मागत आहे. अद्याप तरी पक्षाने मला कोणतेही काम दिले नाही. त्यामुळे पक्षाला जर माझी गरज नसेल तर पक्षाने मला मोकळं करावं. या आधी मी एनजीओच्या माध्यमातून समाजकार्य करत होतो. पक्षाने मोकळं केल्यास या पुढेही मी ते काम करत राहीन.' (हेही वाचा, मी पक्षादेश पाळतो, दिवाकर रावते यांच्याकडून नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)

दरम्यान, सावंत यांच्या वरील विधानानंतर त्यांना आपण शिवसेना सोडणार का? असा थेट प्रश्न करण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल सूचक वक्तव्य करत दीपक सावंत म्हणाले, 'आता माझ्याकडे पक्षातील कोणतीही जबाबदारी नाही. तसेच, पक्षाचे कोणतेही पद माझ्याकडे नाही. त्यामुळे सोडायचे असल्यास हातातील शिवबंधनाशिवाय सोडण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे हातावर शिवबंधन आहे. ते मी कधीही सोडू शकतो', असे सूचक वक्तव्य सावंत यांनी केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घेऊ अशी पुस्तीही सावंत यांनी जोडली.