शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक महेश्वरी (Deepak Maheshwari) यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात केल्याची तक्रार केली आहे. महेश्वरी यांच्याकडून सतत शरिरसुखाची मागणी केली जात आहे, या त्रासाला वैतागून पीडित महिलेने शेवटी पोलीस ठाणे गाठले आहे. महेश्वरी यांच्या विरोधात विनयभंगाचा (Breach of modesty) गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीसांकडून या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.
दीपक महेश्वरी यांची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर महेश्वरी यांनी चेंबूर येथे आपले कार्यालय सुरु केले. त्यानंतर दीपक यांची महिलेसोबत ओळख झाली होती. त्याचबरोबर या महिलेची महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, पीडित महिलेला विनाकारण कार्यालयात बोलावून सतत तिचा विनयभंग केला जात असे. या त्रासाला वैतागून महिलेने कार्यालयात जाणे बंद केले होते. महिलेने कार्यालायत येणे बंद केल्यामुळे महेश्वरी यांनी महिलेला ठार मारण्याची धमकी दिली, असा दावा तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे. हे देखील वाचा-सरकारच्या 'या' धोरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भडकले, पाहा काय म्हणाले?
याआधीही महेश्वरी यांनी पीडित महिलेला पक्षाच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे, असे सांगून तिला गाडीत बसवून मानखूर्द (Mankhurd) येथील रहदारी नसलेल्या जागेवर घेऊन गेले होते. त्यावेळी महेश्वरी यांनी या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. परंतु महिलेने स्पष्ट नकार दिल्यामुळे महेश्वरी यांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी महिलेने लगेच रिक्षा पकडून तिचे घर गाठले. त्यानंतर महिलेने कार्यालयात जाणे बंद केले. पीडित महिला कार्यालयात येत नसल्यामुळे महेश्वरी यांनी फोनच्या माध्यमातून महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत माझी ओळख आहे, असे महेश्वरी यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. परंतु नेहमीच्या या त्रासाला वैतागून महिलेने चेंबूर (Chembur) येथील पोलिसात महेश्वरी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.