महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना शनिवारी उधाण आलं होतं. परंतु, आज अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मी नाराज नसून शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी हितचिंतकांनी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'मी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. मला राजीनामा द्यायचा असता तर तो मी पक्ष नेतृत्वाकडे दिला असता. मात्र, काही लोकांनी पुड्या सोडण्याचं काम केलं. पुड्या सोडणाऱ्यांची शहानिशा करण्यात येईल. मी कोणावरही नाराज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कोठेही कमी पडणार नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - अब्दुल सत्तार: मी राजीनामा दिला की नाही हे त्यांना विचारा ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या)
औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार गटाच्या 6 सदस्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तसेच अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, अशा शब्दात खैरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती.