अब्दुल सत्तार: मी राजीनामा दिला की नाही हे त्यांना विचारा ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या
अब्दुल सत्तार (फोटो सौजन्य-फेसबुक)

Abdul Sattar On His Resignation: शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर आपल्या राजीनाम्याबाबत मौन सोडलं आहे. तब्बल 9 तासांनी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर राजीनाम्याबाबत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याचं वृत्त साफ खोटं आहे असं म्हणत फेटाळून लावलं आहे. इतकंच नव्हे तर ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांनाच त्याचा जाब विचारा असं देखील ते म्हणाले.

“मी आता कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी माझी भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडेन. मी योग्यवेळी उत्तर देईन. माझ्याबद्दल कोण काय बोलले त्याची सर्व माहिती मी पक्षप्रमुखांना देईल. मी राजीनामा दिला की नाही हे त्यांना विचारा ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या. कुणी काही बोलेल, पण माझा सर्व कंट्रोल मातोश्रीवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करुन मी तुमच्याशी बोलीन” असे अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते अशी चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला असल्याचंही बोललं जात होतं. त्यानंतर भाजपने शिवसेनेवर निशाणा देखील साधला. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

दरम्यान, अब्दुल सत्तार हे सकाळपासून औरंगाबाद मधील एका हॉटेलमध्ये होते. त्यांनी स्वत: राजीनाम्याबाबत दिवसभरात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु, सत्तार अखेरीस 9 तासांनी हॉटेल बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं.