शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची पुढील 3 वर्षासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
Siddhivinayak Temple, Aadesh Bandekar (Photo Credits: Wikimedia Commons Facebook)

प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर (Shiv Sena Leader Aadesh Bandekar) यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट (Sri Siddhivinayak Temple Trust) चे अध्यक्ष (Chairman) म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील 3 वर्षासाठी त्यांच्यावर या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना देण्यात आलेलं हे पद राज्यमंत्री पदाच्या समतुल्य असे असणार आहे. याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. तसेच यासंदर्भात राज्य सरकारच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

आदेश बांदेकर यांच्याकडे 24 जुलै 2020 पासून पुढील 3 वर्षे विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहील. गेल्या काही दिवसापासून बांदेकर यांच्या निवडीची चर्चा होती. परंतु, आज यासंदर्भात औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा - COVID-19 Pandemic मध्ये गरोदर आणि आजारी असणाऱ्या महिलांना ऑफिसला न येण्याची मुभा- महाराष्ट्र सरकार)

आदेश बांदेकर हे उत्तम कलाकार आहेत. याशिवाय प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि राजकारणी आहेत. यांचा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घरा-घरात लोकप्रिय झाला होता. आदेश बांदेकर यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायकाच्या मंदिरामध्ये कोरोनामुळे बंधने घातली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिद्धीविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटाझर देण्यात येणार असून हात निर्जंतूक केल्यानंतरचं मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याचं आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलं होतं.