शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Photo Credit: ShivSena/twitter)

मुंबई: 'गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे', अशा स्पष्ट शब्दांत भाजपचा सत्तासहभागी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी 'गोव्यात संकट आयाराम, गयाराम आणि घाशीराम' या मथळ्याखाली एक लेख लिहिला आहे. या लेखात गोव्यातील बदलती सत्तासमिकरणे आणि विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण यावर सुरु असलेल्या खलबतांवर ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. सामनातील लेखात ठाकरे म्हणतात, 'पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे.'

दरम्यान, '''भारतीय जनता पक्षात (गोवा) पर्रीकरानंतर कोण?'' असा प्रश्न विचारला जात आहे. पर्रीकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत', असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.