Navneet Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

अपक्ष आमदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एमआयआर (MIR) कक्षात केलेल्या फोटोशेशनमुळे लीलावती रुग्णालय (Lilavati Hospital) प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. एमआयआर कक्षात घ्यावयाची काळजी याबाबत काही नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करत नवनीत राणा यांनी फोटोशेशन ( Navneet Rana Photo Session) केल्याचा आरोप आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने लीलावती रुग्णालयात जाऊन घडल्या प्रकाराबद्दल प्रशासनाला जाब विचारला. या वेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि इतरही काही शिवसेना नेते उपस्थित होते.

शिवसेना नेत्यांनी या वेळी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. कोणताही रुग्ण जेव्हा एमआयआर कक्षात जातो तेव्हा नियमांचे पालन करत त्याच्याजवळी सर्व वस्तू बाहेरच काढून ठेवायला सांगितल्या जातात. असे असताना खासदार नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना त्यांनी फोटोशेशन केलेच कसे असा संतप्त सवाल शिवसेना नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला. सुरुवातीच्या काळात प्रशासनाने काही तोडकीमोडकी उत्तरे देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. मात्र, शिवसेना नेत्यांनी नियमांवर बोट ठेवत आक्रमकपणे विचारलेल्या प्रश्नांवर प्रशासनही निरुत्तर झाले.

नवनीत राणा यांचा एमआयआर सुरु असताना नियमबाह्य पद्धतीने कोणी कक्षात आले होते का? रुग्णालयातील कर्मचारी अथवा इतर कोणत्या बाहेरच्या व्यक्तीने हे फोटो शूट केले का? मुळात कक्षामध्ये कोणतीही धातूची वस्तू न्यायला परवानगी आहे का? रुग्णालयाती एमआयआर कक्षात काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना नियमांची पुरेशी माहिती आहे का? या नियमांचे त्यांनी पालन केले होते का? अशा एकामागून एक प्रश्नांचा भडीमारच शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनावर केल्याचे पाहायला मिळाले.

रुग्णालयाचे व्यवस्थापन खासगी असले तरी त्याला जागा आणि इतर सुविधा हे सरकार देत असते. दुसऱ्या बाजूला रुग्णालयाचा नावलौकीक आणि त्याची जनतेच्या मनात असलेली प्रतिमा या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून अशा गोष्टींना धक्का लागणार नाही याची नेहमीच खबरदारी घेणे आवश्यक असते, असाही मुद्दा शिवसेना नेत्या मनीशा कायंदे यांनी या वेळी उपस्थित केला.