कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुबंईतील खाजगी दवाखाने उघडे ठेवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले होते. मात्र, वारंवार सांगूनही मुंबईत काही भागातील खाजगी दवाखाने अजूनही बंदच आहेत. यामुळे इतर साथींच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुंबईकरांना दवाखान्यांसाठी खूप ठिकाणी फिरावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील शिवसेना शाखांचे (Shiv Sena Branches In Mumbai) रुपांतर आता दवाखान्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे. यानंतर मुंबईतील ज्या भागात खाजगी दवाखाने सुरु नाहीत, तेथील नागरिकांना जवळच्या शिवसेना शाखेत उपचार घेता येणार आहे.
संकटाच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक हा कायम पुढे असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये, म्हणून शिवसेनेच्या शाखांमध्ये तात्पुरते दवाखाने तुम्हाला कार्यरत दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील निवडक संपादकांच्या चर्चेत व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, दादर येथे सुमारे तासभर झालेल्या चर्चेत करोनाबाबतच्या उपाययोजना आणि राज्य सरकारची तयारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खरगे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, माहिती संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे, शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते. हे देखील वाचा- महाराष्ट्र: कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी काम करताना 3 Ply Mask किंवा Surgical Mask लावणे अनिवार्य; राज्य सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर
अनिल परब यांचे ट्विट-
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शाखांचे रूपांतर दवाखान्यात करण्यात येणार आहे.@CMOMaharashtra @ShivSena @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/h4WcvULJeo
— Anil Parab (@advanilparab) May 31, 2020
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 38 हजार 442 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1 हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 हजार 364 जणांनी कोरोनावर मात केली आहे.