
नुकतेच सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर (Om Prakash Mathur) यांच्या सन्मानार्थ मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उपस्थित राहिले. सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली आणि त्यावेळी नक्की काय झाले याबाबत माहिती दिली. तर शिवसेना-भाजप युतीच्या 25 वर्षांच्या सहकार्याचा 2014 मध्ये अंत झाला. या विभाजनामागील मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावरून झालेला मतभेद. शिवसेना 151 जागांवर लढण्याचा आग्रह धरत होती, तर भाजपला आणि इतर छोट्या पक्षांना उर्वरित जागा देण्याचे सुचवले होते. भाजपने या प्रस्तावाला विरोध केला, कारण त्यांना वाटले की इतर सहयोगी पक्षांना न्याय्य वाटा मिळत नाही.
भाजपच्या राज्य नेतृत्वाने सांगितले की, त्यांनी युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु शिवसेनेच्या ‘अडून बसलेल्या’ भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी हेही स्पष्ट केले की, निवडणुकीदरम्यान शिवसेनेवर टीका करणार नाहीत आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील. या मतभेदांमुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकाळाच्या राजकीय सहकार्याचा अंत झाला. आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही शिवसेनेला 147 जागा देण्यास तयार होतो आणि मुख्यमंत्री आमच्या बाजूचा, तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असे ठरले होते. सुरुवातीच्या चर्चेत परस्पर सामंजस्य असल्याचे संकेत मिळाले.
जागावाटपाचा जो फॉर्म्युला होता त्यानुसार, शिवसेना 147 जागा लढवणार असून भाजप 127 जागा लढवणार होते. परंतु उद्धव ठाकरे 151 जागांवर ठाम राहिले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, याबाबत शिवसेना नेतृत्वाशी आमची बोलणी सुरू होती आणि त्यांना आणखी जागा द्यायलाही आम्ही तयार होतो, मात्र उद्धव यांनी मनाशी 151 ही संख्या निश्चित केली होती. त्यावेळी ओम प्रकाश माथूर हे भाजप नेते अमित शहा यांच्याशी बोलले आणि नंतर हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांशी बोलले, आणि भाजपसाठी 127 आणि शिवसेनेसाठी 147 असा फॉर्म्युला असेल, तरच युती राहील, अन्यथा युती राहणार नाही, असे ठरले. (हेही वाचा: Aaditya Thackeray vs Eknath Shinde: आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे बैठकीत आमनेसामने; शिंदे आल्यानंतर सर्वजण उठले पण आदित्य ठाकरेंनी काय केलं? तुम्हीचं पहा)
Shiv Sena-BJP Alliance:
#WATCH | Mumbai: Speaking at a function organized in honour of senior BJP leader and Sikkim Governor Om Prakash Mathur, Maharashtra CM Devendra Fadnavis said, "... When the talks of alliance started, the Shiv Sena of that time had decided in its mind that it had to contest only… pic.twitter.com/hs7scaorZR
— ANI (@ANI) March 24, 2025
फडणवीस म्हणाले, जागावाटपावरून युती तुटली. त्यावेळी मला अमित शहा आणि ओम प्रकाश माथूर यांच्यावर विश्वास होता. आम्हाला वाटत होते की, आम्ही जिंकू, मात्र बाकीचे पक्ष तितकेसे आशावादी नव्हते. मात्र अखेर आम्ही जिंकलो. फडणवीस यांनी निवडणुकीच्या रणनीतीची माहितीही दिली. जागावाटपाच्या चर्चेत अपयश आले असले तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विक्रमी मतदारसंघ कसे लढवले यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, आम्ही 260 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती, जी अभूतपूर्व होती. याआधी आम्ही 117 पेक्षा जास्त जागांवर कधीही निवडणूक लढवली नव्हती. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, 260 जागांवर निवडणूक लढवण्याच्या या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्रात भाजपच्या यशाचा पाया घातला गेला. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, तेव्हापासून भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राहिला आहे आणि गेल्या 30 वर्षांत 100 जागांचा टप्पा पार करणारा एकमेव पक्ष आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि ओम प्रकाश माथूर यांना जाते.