शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे हे नाव आपसूकच पुढे येते. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना त्यांच्या निधनानंतर पुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली स्थिरावली, विस्तारली. पण पुढे काहीच वर्षांमध्ये सेनेत अभूतपूर्व बंडाळी माजली आणि एकनाथ शिंदे यांच्या रुपात सवता सुभा निर्माण झाला. ही दुफळी इतकी टोकाला गेली की, वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचला आणि निवडणूक आयोगाने चक्क अख्खी शिवसेनाच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली. त्यातून सुरु झाला अभूतपूर्व संघर्ष. आता शिवसेना आणि शिवसेना (UBT) असे दोन स्वतंत्र गट पाहायला मिळत असून त्यांच्यात संघर्षही टोकाचा होत आहे. वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्तानेही हा संघर्ष पुढे आला आहे. येत्या 19 जून रोजी शिवसेना वर्धापन दिन असतो. शिवसेनेच्या अवघ्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी वेगवेगळे वर्धापन दिन (Shivsena Anniversary) साजरे होते आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. जो कोर्टाच्या दारात आहे. तोपर्यंत तरी शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन पाहायला मिळू शकतात.
शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केले. ज्यामुळे महाविकासआघाडीच्या सत्तेची गणीतं बदलून गेली. पुढे ठाकरे सरकार कोसळले. शिंदे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला गेला. जो निवडणूक आयोगानेही मान्य केला. त्यामुळे आता सामान्य शिवसैनिकांच्या मनातही संभ्रम आहे. खरी शिवसेना कोणाची. भावनिक नाते असलेल्या उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची. (हेही वाचा, Shiv Sena Update: एकनाथ शिंदे गटात धुसफूस? 22 आमदार, 9 खासदार बाहेर पडण्याची शक्यता, उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूच्या दाव्याने खळबळ)
दरम्यान, दोन्ही पक्षनेतृत्वांकडून आपापल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश गेल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते आपापल्या पक्षाचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी कामाला लागले आहेत. तशी तयारीदेखील सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची वर्धापन दिनासाठी तयारी आदीपासूनच सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडूनही वर्धापन दिन कार्यक्रमासाठी जोमाने प्रयत्न करावे लागत आहेत.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल आला. त्यानंतर ठाकगे गटाकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 18 जून रोजी मुंबई आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीतच उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हमून फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांनी सल्लामसलत सुरु असून लवकरच निश्चित धोरण ठरवले जाणार असल्याचे समजते. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे. या सभेत काय ठरते याबाबत उत्सुकता आहे.