
सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला आहे. 18 एप्रिलच्या संध्याकाळी आयसीयू मध्ये रूग्णांची तपासणी करून घरी गेल्यानंतर रात्री आठ- साडेआठच्या सुमारास परिवारासोबत जेवण केल्यानंतर अचानक फोन वर बोलण्याचा बहाणा करत डॉक्टर शिरीष वळसंगकर बाथरूम मध्ये गेले तेथे त्यांनी डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिरीष वळसंगकर यांना नजिकच्या त्यांच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांचे प्रयत्न असफल ठरले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
शिरीष वळसंगकर यांचा मुलगा, सून देखील न्युरोलॉजिस्ट आहेत. मुलगा अश्विन यानेच शिरीष यांच्यावर प्राथमिक उपचार केले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. दरम्यान शिरीष यांनी स्वतःच्याच रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या अशा निधनाच्या वृत्ताने सोलापूरात सामान्य नागरिक, त्यांच्या हॉस्पिटल मधील कर्मचारी सार्यांनीच हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. रात्री त्यांच्या हॉस्पिटल बाहेत सामान्य नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या का केली? याचं कारण समजू शकलेलं नाही.
शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले होते. पुढे ते शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी चे शिक्षण घेऊन महाराष्ट्रात परतले. त्यांनी अनेक ठिकाणी रूग्णसेवा दिली आहे. एसपी इन्स्टिटयूट ऑफ न्युरोसायन्सेस, सोलापूरचे ते प्रमुख होते. नक्की वाचा: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert.
विमानाने संपूर्ण जग फिरायचं स्वप्न राहिलं अधुरं
शिरीष वळसंगकर यांचं विमानाने संपूर्ण जग फिरायचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी डबल इंजिन डायमंड प्लेनदेखील खरेदी केलं होतं. त्यासाठी ते आखणी देखील करत असताना अचानक आयुष्य संपवण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे.
दरम्यान आज (19 एप्रिल) शिरीष वळसंगकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिरीष वळसंगकर यांच्या पश्चात पत्नी, मुलं, सून असा परिवार आहे.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.