Ganpatrao Deshmukh: गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे सांगोला शोकाकूल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह राजकीय वर्तुळाकडून दु:ख व्यक्त, पाहा प्रतिक्रिया
Ganpatrao Deshmukh | (File Image)

शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुंख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोला (Sangola) तालुका शोकसागरात बुडाला आहे. राजकीय वर्तुळातूनही दु:खद प्रतिक्रिया आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शेकाप नेते जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शरद पवार

गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! (हेही वाचा, Ganpatrao Deshmukh Passes Away: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी कधी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची.

सुप्रिया सुळे

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबा) यांचे निधन झाले.महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता.सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली.त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ आहे.

विधानसभेतवर तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड गणपतराव देशमुख यांच्या नावावर होता. साधी रहाणी असणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे नेते म्हणून मा. गणपतराव देशमुख यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकीय विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.