Sheetal Mhatre, Prakash Surve | (Photo Credits: Archived, edited)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा व्हायरल झालेला वादग्रस्त व्हिडिओ देशभर व्हायरल झाला आहे.  एका@ysathishreddy या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला हे काय सुरु आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करत शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दिलीआहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटाच्या आमदारांकडून आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे हे या यात्रेचे आयोजक होते. ही यात्रा श्रीकृष्णनगर येथून अशोकवन जंक्शन, दहिसर पूर्व ते मुंबईपर्यंत काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे, महिला नेत्या शीतल म्हात्रे सहभागही झाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एका उघड्या ट्रकमधून आशीर्वाद यात्रेच्या पुढे होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्यातील एक दृश्य कॅमेऱ्यांनी टीपले. याच दृश्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत वाद सुरु असून हा वात पोलिसांत पोहोचला आहे. (हेही वाचा, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश)

दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा असल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या व्हिडिओसंदर्भात म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ अज्ञाताने मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाली असा दावा म्हत्रे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील अनेक युजर्स आणि पेजची नावे अंतर्भूत केली आहेत.