Sonia Gandhi, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असे सांगितले जात आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुद्धा सुरु असल्याने शिवसेना( Shiv Sena)- राष्ट्रवादी (NCP) महाआघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. याच कारणास्तव आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार  (Sharad Pawar) उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल हे लवकरच स्पष्ट होणार असले तरीही काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला समर्थन मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेत सत्तेचा पेच सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे या भेटीनंतर काय निष्कर्ष ठरतो ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र मिळून कॉमन मिनिमम कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमाचा अहवाल पक्षांच्या नेतेमंडळींना पाठवण्यात आला आहे.(शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार?)

गेल्या काही दिवसांपासून तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानुसार राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात येईल आणि पाच वर्षे कायम राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले परंतु, राज्यात सत्तास्थापनेची तिढा कायम आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील? की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला हात देऊन महाशिवआघाडी स्थापन करेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.