Sharad Pawar Warning Opposition: 'लक्षात ठेवा! शरद पवार म्हणतात, सोडणार नाही', लोणावळा येथून थेट निशाणा; वाचा सविस्तर
Sharad Pawar | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पक्ष फोडून सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्या अजित पवार यांच्या सत्ताधारी आमदारांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलाच दम भरला आहे. लोणावळा (Lonavala) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते आज (7 मार्च 2024) बोलत होते. लोणावळा शहर हे आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या मतदारसंघात येते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दमबाजी केल्याची माहिती कार्यकर्त्यांनी पवार यांना दिली. या वेळी शरद पवार यांनी सांगितले की, मला शरद पवार म्हणतात. मी सहसा वेगळ्या मार्गाला जात नाही. पण, लक्षात ठेवा. शरद पवार म्हणतात मला, जर कुणी वाकड्यात गेला तर सोडतही नाही, असे पवार म्हणाले.

आमदार सुनिल शेळके यांच्यावर हल्लाबोल करत शरद पवार यांनी म्हटले की, आमदार होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जो अर्ज भरला त्यावर माझी सही होती. तू आमदार कोणामुळे झालास? ज्यांनी जनतेशी प्रतारणा केली त्यांना या निवडणुकी धडा शिकविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण त्यांना माहिती देणाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली. आज त्यांची लोणावळ्यात सभा होती. या सभेला त्यांना गर्दी जमवता आली नसल्याने थेट पवार साहेबांनाच चुकीची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. असे असले तरीही आपण अजित पवार यांच्याच पाठीशी ठाम राहणार आहोत. आम्ही पद आणि प्रतिष्ठा, राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. आम्ही निष्टेने काम करत असतो. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा मी नक्की विचार करेन असेही आमदार शेळके म्हणाले. पवार साहेबांनी मला त्यांच्या दम दिलेल्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर द्यावा. मी स्वत: त्याच्यासोबत बोलून दिलगिरी व्यक्त करेन, असेही शेळके म्हणाले.

दरम्यान, लोणावळा येथील सभेत शरद पवार आक्रमक पण संयत पाहायला मिळाले. या निवडणुकीत उमेदवार आणि त्याचे चिन्ह पाहून मतदान करा. शिवसेना (UBT) पक्षाचे मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तुतारी तर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्हा हाताचा पंजा आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार नसला तरीही महाविकासआघाडीतील उमेदवार पाहायचा आणि मशाल, तुतारी आणि हाताचा पंजा पाहून मतदान करायचे, असे थेट अवाहनही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.