Sharad Pawar | (Photo Credit - Facebook)

Sharad Pawar Takes Back His Resignation: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निर्णयावर खूश नसल्याने राजीनामा मागे घेतल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. माझ्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. माझ्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी मला पुनर्विचार करण्याची विनंती केल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. मी तुमच्या भावनांचा अनादर करू शकत नाही. माझ्यावर दाखवलेल्या आपुलकीने आणि विश्वासाने मला भारावून टाकले आहे. समितीच्या निर्णयाचा आदर करत मी माझा राजीनामा परत घेत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सर्व गोष्टींचा पुनर्विचार केल्यानंतर, मी पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवणार असल्याचे जाहीर करतो. मी माझा पूर्वीचा निर्णय मागे घेतो, असेही शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अनुपस्थित होते. यासंदर्भात शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की, निवृत्त होण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनीदेखील राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. आज अजित पवार पत्रकार परिषदेला उपस्थित नाहीत. याचा अर्थ ते नाराज आहेत असं नाहीये, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Sharad Pawar Resignation: शरद पवारांचे नेतृत्व आवश्यक, त्यांना पर्याय नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा फेटाळल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, Watch Video)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख समितीने शुक्रवारी शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळल्यानंतर लगेचच पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या समितीकडून फेटाळण्यात आला.