Sangli and Madha Lok Sabha constituencies: शरद पवार यांचा डाव, माढ्याचा तिढा सुटला, सांगलीतही मनोमिलन; महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रयत्नांना ठाकरे आणि पवार हे तोडीस तोड खेळी करत आहेत. सांगली आणि माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) हे प्रकर्षाणे पाहायला मिळाले. माढ्यातून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती, मात्र ऐनवेळी त्यांनी महायुतीचा मार्ग पत्करल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत. दुसऱ्या बाजूला सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) चंद्रहार पाटील यांना शिवसेना (UBT) पक्षाने उमेदवारी दिली आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातून बंडखोरीची पडघम वाजत होते. आघाडीने आवश्यक डॅमेज कंट्रोल वेळीच केल्याचे पाहयला मिळत आहे.

माढ्याचा तिढा सुटला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रासपच्या महादेव जानकर यांना पाठिंबा देऊन माढ्यातून उमेदवारी देण्याच्या विचारात होती. मात्र, महायुतीने त्यांना हिंगोली येथून उमेदवारी दिली. भाजपने या ठिकामी निंबाळकर यांना उमेदवारी दिली. परिणामी शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्याशी संवाद साधत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यावरुन काहीसे नाराज झालेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अनिकेत देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकवले. अनिकेत देशमूख हे दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. 'निष्ठावंत उमेदवार असताना भाजपकडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, त्यांची समजूत काढण्यात शरद पवार यांना यश आले आहे. पवरांनी त्यांची नाराजी एका रात्रीत दूर केली. त्यामुळे माढ्याच्या जागेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण)

शिवसेना (UBT), काँग्रेस मनोमिलन

सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी थेट जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी पाहयला मिळाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सांगलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मनोमिलन नसल्याचे बोलले जात होते. मात्र, शिवसेना (UBT) उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. त्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत सांगलीत दाखल झाले आहेत. या वेळी महाविकासआघाडी म्हणून संजय राऊत यांच्यासोबत जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही पाहायला मिळाले. त्यामुळे अखेरच्या दिवशी मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे.