राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी याविरोधात नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जर शरद पवारांनी राजीनामा मागे न घेतला तर आपणही आपल्या पदाचा राजीनामा देऊ अशी भूमिका घेतल्याने पक्षाच्या समोरच्या अडचणीत वाढ झालेली पहायला मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत (Lok Sabha Election) शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव आज होणाऱ्या बैठकीत येण्याची शक्यता आहे.
एकीकडे समितीची आज बैठक होणार असून त्यात शरद पवार यांचा राजीनामा किंवा नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब यापैकी एका गोष्टीवर निर्णय होण्याची शक्यता असताना दुसरीकडे शरद पवारांनी तेच अध्यक्षपदी कायम राहण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. गुरुवारी वाय. बी. सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवारांनी “दोन दिवसांनी तुम्हाला असं आंदोलन करायला बसावं लागणार नाही”, असं विधान केल्यामुळे तेच अध्यक्ष राहण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान अध्यक्ष निवडीच्या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. ही समिती आज कोणता निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष असले.