विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रचार सभांच्या तोफा येत्या शनिवारी म्हणजेच (21 ऑक्टोबर) थंड होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) चक्क 'ईडी' लाच टार्गेट करुन 'मला ईडी ची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नसून मी तुमच्या 'ईडी'लाच 'येडी' करून टाकीन' अशी तुफानी टोलेबाजी पंढरपूरातील प्रचारसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आज येथील शिवतीर्थावर पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहेत, असे सांगत तुम्हाला हेच करायचे असेल तर जा ना मोडनिंबला, असा टोला शरद पवारांनी लगावला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात, हे येत्या 24 तारखेला दिसेल, अशी फटकेबाजीही पवारांनी केली.
हेदेखील वाचा- अहमदनगर: भाजपवाल्यांना दारात उभे करु नका; शरद पवार यांचे शेतकऱ्यांना अवाहन
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले असतानाच राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब गंभीर असून शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यास सुप्रीम कोर्टाचे आदेश, मात्र गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव; शरद पवार यांची टीका
या प्रचार सभेवेळी व्यासपाठीवार राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आवर्जून उपस्थित होते. त्यांनीही 'पवार आणि मी एकत्र येऊन कोणाला फेकून देऊ ते कळणार नाही' असे सांगत टोलेबाजी केली. दरम्यान या सभेत भाजपाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्यावर दोघांनी टीका करण्याचे टाळले.