Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) अध्यक्ष म्हणून माझी निवड करताना तुमच्या सह्या आहेत आणि आता ही निवड मान्य नाही असे सांगता? असा सवाल उपस्थित करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार आणि बंडखोर गटाला ठणकावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा वादावर केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी घेऊन उद्या निर्णय देणार आहे. तत्पूर्वी शरद पवार गटाच्या विस्तारीत कार्यकारिणीची एक बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत संबोधित करताना शरद पवार बोलत होते. या वेळी पवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. तसेच देशाचा मूड बदलतो आहे. भाजपची सत्ता दूर करण्याचा देशातील जनतेचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'निर्णय काहीही लागला तरी चिंतेचे कारण नाही'

शरद पवार यांनी सांगीतले की, निर्णय आपल्या बाजूने आला किंवा विरोधात आला तरी चिंता करण्याचे कारण नाही. शेवटी जनतेच्या मनात असेल तर चिन्ह आणि नाव काहीही असले तरी फरक पडत नाही. मी स्वत: अनेक वेळा वेगवेगल्या चिन्हावर निवडणूक लढलो आहे. केवळ लढलोच नाही तर, मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील संघर्ष आणि विविध वाद, स्थित्यांतराचा दाखलाही दिला. या वेळी बोलताना निवडणूक आयोगात निर्णय आपल्याच बाजून लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'देशातील वातावरण बदलते आहे, भाजप सत्तेतून जाणार'

केंद्रात भाजप बहुमताने सत्तेत असला तरी देशातील वातावरण बदलत आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. ज्या ठिकाणी आहे त्यातील अनेक राज्यांमध्ये असलेली सरकारे पाडून किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना म्हणजेच पक्षांना फोडून आपल्या बाजूला घेतले आहे. असे मोडतोड करुन ते सत्तेत आहेत. अगदीच अपवाद वगळता खूपच कमी ठिकाणी भाजपची बहुमतातील सत्ता आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, देशाचा मूड बदलतो आहे, असे पवार म्हणाले.

'मणिपूर हिंसाचार प्रकरणावर पंतप्रधानांचे मौन'

मणीपूर राज्यात हिंसाचार सुरु झाला. तिथल्या काही महिलांची नग्न धिंड काढली. पण त्याबद्दल एकही शब्द बोलण्याची किंवा तिथे एकही दौरा काढण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) यांनी केला नाही. त्या उलट ते इतर ठिकाणी आणि जगभर फिरत असतात. इतर अनेक मुद्द्यांवर बोलत असतात. पण मणिपूर विषयावर बोलण्याचे त्यांना धाडस होत नाही.

'10 वर्षांपूर्वी ईडी संस्था होती'

आजवर देशातील जनतेला ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांची नावेही माहिती नव्हती. पण, या सरकारच्या काळात देशातील घराघरात ईडी, सीबीआयचे नाव पोहोचले. जे नेते राज्य आणि केंद्र सरकार विरोधात बोलतात. जे पत्रकार विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारतात त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जातात. त्यांना त्रास दिला जातो. खरे सांगायचे तर 10 वर्षांपू्र्वी ईडी ही संस्था होती. आज ती तशी राहिली नाही, असेही शरद पवार म्हणाले.