CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी
Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ ANI

सध्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी नागरिकत्व कायाद्याला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या नागरिकत्त्व कायद्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली बाजू मांडताना त्याला विरोध दर्शवला आहे. हा कायदा देशातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याचं सांगत केंद्र आणि राज्यात काही ठिकाणी जाणीवपूर्वक तणावग्रस्त स्थिती बनवत असल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) संसदेमध्येही या कायद्याला विरोध केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डांबून ठेवणं चूकीचं असल्याचं म्हणत एल्गार परिषदेतील भाषणांवरून काहींना देशद्रोही ठरवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. नागरिकत्व कायद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहांवर उपहासात्मक टीका; आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी खेळी असल्याचंं सांगत हल्लाबोल

एल्गार परिषदेतील कारवाईबाबत माजी न्यायमूर्तींची चौकशी समिती तपास करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. सत्तेचा गैरवापर करून साहित्यिकांवर कारवाई करण्याचं काम चूकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच कॅगचा अहवालदेखील गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नागरिकत्त्व कायद्यावरून आंदोलन करताना नागरिकांनी समाजात धार्मिक संघर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. शांतता, संयमाने विरोध करण्याचं म्हटलं आहे. तर 8 राज्यांनी कॅबच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कॅब लागू होणार का?

राज्यात कॅब लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याने त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना कॅबला विरोध दर्शवला आहे. तर एल्गार परिषदेवरून पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करताना तत्कालीन भाजपा सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.