Sharad Pawar दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने रवाना... काय असू शकते या मागचे कारण?
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

महाराष्ट्र राज्यात सरकार नवं बनवण्यासाठी आता 2 दिवसांहून कमी काळ बाकी आहे. अशावेळी राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपलं राज्यातील दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

'महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे आणि आम्ही त्याचा सन्मान राखणार आहोत', असे स्पष्ट मत व्यक्त करत शरद पवार चार दिवसांचा शेतकरी संवाद दौरा करत होते. परंतु हाच दौरा अर्धवट सोडून ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळालेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा तोपर्यंत न केल्यास राज्याची सर्वच समीकरणे बदल्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती आपली मुंबईतील उपस्थितीचं महत्त्व लक्षात घेऊन पवारांनी मुंबईत परतण्याचे ठरवले असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप तरी शरद पवार यांच्या मुंबईकडे येण्याच्या निर्णयाचं कारण सांगण्यात आलेलं नाही.

महाराष्ट्रात 9 नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल यांच्याकडे 'हे' पर्याय

कोकणात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार कोकणात जाणार होते. पण तो दौरा रद्द करत त्यांनी मुंबईच्या दिशेने येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात काही काळ थांबून ते आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत परततील.