Sharad Pawar | (Image Credit - ANI Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस NCP) पक्षात अजित पवार (Ajit Pawar) अस्वस्थ असून बंडाच्या पवित्र्यात आहेत. लवकरच ते आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. प्रसारमाध्यमांतूनही असेच चित्र रंगविण्यात आले आहे. या सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया काय? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर थोरले पवार म्हणजेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अत्यंत मोजक्या शब्दांत भाष्य (Sharad Pawar On Ajit Pawar) केले आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवार यांचे नेमके काय चालले आहे तेही सांगितले आहे.

अजित पवार यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्या आणि चर्चा केवळ निराधार आहेत. त्या केवळ तथ्य आणि अपुऱ्या माहितीवर काढलेल्या अनुमानावर आधारीत आहेत. अजित पवार हे सध्या निवडणुकांच्या कामामध्ये व्यग्र आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकासआघाचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार यांच्या नाराजी आणि कथीत संभाव्य बंडाचे वृत्त फेटाळून लावले आहे. आपल्याकडे पक्की माहिती असून, अजित पवार कोठेही जाणार नाहीत. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांचे नेतृत्व महाविकासआघाडीतच यशोशिखरावर जाईल, अशी भविष्यवाणीही संजय राऊत यांनी केली आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Ajit Pawar: अजित पवार यांच्याबद्दलच्या राजकीय चर्चांवर संजय राऊत यांचे महत्तवाचे भाष्य, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासोबतच्या चर्चेचाही दिला तपशील)

ट्विट

पाठिमागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांतून रोज नवनव्या बातम्या येत आहेत. जवळपास सर्वच वृत्तांचा रोख हा थेट अजित पवार नाराज असण्यावर आणि लवकरच ते समर्थकांसह भाजप प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांकडे आहे. अजित पवार हे अचानक प्रसारमाध्यमांच्या कंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या छोट्यामोठ्या घटना, निर्णय आणि वर्तनाच्या बातम्या होऊ लागल्या आहेत. थोडक्यात काय तर अजित पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांची कसून नजर आहे.