मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर राज्यात राजकीय भूकंप उद्भवला आहे. विरोधकांनी सरकारला घेरलं असून गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसंच यात राष्ट्रवादीची भूमिका काय असणार यासंदर्भातही बोलणे झाल्याचे समजते. (परम बीर सिंग यांच्या पत्रात स्वाक्षरी नाही; प्राप्त झालेल्या इमेल पत्राबाबत शहानिशा होणार- Chief Minister's Office)
या प्रकरणी शरद पवार दिल्लीत आज सायंकाळी 7 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्र लिहून गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे आरोप केले आहेत. तसंच मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते.
यानंतर एकच वादंग उभा राहिला. विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई पासून बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते देशमुखांची पाठराखण करताना दिसत आहेत.