मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या नावाने प्राप्त झालेल्या इमेलने आज संध्याकाळी मोठा बॉम्ब टाकला. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे, त्या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे सांगितले आहे. आता या इमेल बाबत शहानिशा होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खालाबाद उडाली असून, देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या पत्रातील आरोप गंभीर असल्याने त्याबाबत चौकशी होणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, ‘गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’
वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते. (हेही वाचा: परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध केले पाहिजेत, मी त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करीत आहे- Maharashtra Home Minister Anil Deshmukh)
दरम्यान, या पत्रातील दावे देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे व मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. त्यांनी स्वत: चा बचाव करण्यासाठी हे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर आरोपांची निःपक्षपाती चौकशी करावी. परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध केले पाहिजेत, मी त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करीत आहे.’