Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी गोष्ट आज संध्याकाळी घडली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर आरोप केले आहेत. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात, देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे नमूद केले आहे. त्यानंतर आता परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध केले पाहिजेत, मी त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करीत आहे, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

घडलेल्या गोष्टीवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे व मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. त्यांनी स्वत: चा बचाव करण्यासाठी हे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी ते का काही नाही बोलले? मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.’ (हेही वाचा: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या राजीनाम्याची मागणी; जाणून घ्या काय म्हणत आहे महाराष्ट्रातील नेते)

याबाबत देशमुख यांनी एक पत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, 'आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता.

या chat च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?'

ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी या गंभीर आरोपांची निःपक्षपाती चौकशी करावी. परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध केले पाहिजेत, मी त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करीत आहे.’ सिंग यांनी पत्रात हे पैसे वसूल करण्याच्या गृहमंत्र्यांचा मार्गही सांगितला आहे. ते म्हणतात, गृहमंत्री म्हणाले होते की, मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते.