Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ Supriya Sule

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी त्यांच्यावर मागील 21 दिवसांत दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यानंतर काल (20 एप्रिल) पुन्हा शरद पवार यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. एनसीपीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर (Gall Bladder Surgery) फॉलो अप प्रोसिजर (Follow Up Procedure) साठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार होत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्यावर पोटदुखीचा त्रास होत असल्याने पहिल्यांदा 30 मार्चला दाखल करत पित्ताशयातील खडे काढण्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर 12 एप्रिलला पित्ताशयावर ऑपरेशन झालं होतं. या दोन्ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कॉपी या अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. या दोन्ही ऑपरेशन नंतर शरद पवार काही दिवस सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी आले होते. मागील 20 दिवसांत त्यांचे राजकीय कार्यक्रम रद्द झाले असले तरीही शरद पवार राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी संजय राऊत, दिलीपवळसे पाटील यांची भेट घेतली आहे.

Nawab Malik ट्वीट

दरम्यान ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. अमित मायदेव यांच्या निगराणीखाली शरद पवारांवर उपचार सुरू आहेत. शरद पवारांसोबत त्यांची लेक, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य पवार कुटुंबातील मंडळी आहेत.