Shakti Mills Rape Case:  शक्ती मिल  बालात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी; आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहणार?
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

2013 मधील मुंबईसह सार्‍या देशाला सुन्न करणारी एक म्हणजे शक्ती मिल बलात्कार प्रकरण (Shakti Mills Rape Case). आज या गॅंगरेप प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा कायम रहावी म्हणून राज्य सरकारने याचिका केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती साधना जाधव, पृथ्वीराज चव्हाण यांचं खंडपीठ निर्णय घेणार आहे. दरम्यान आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहणार की त्यांना जन्मठेप होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा आणि भयंकर गुन्हा आहे. शारिरीक धक्क्यासोबतच यामध्ये मानसिक धक्का बसतो. अनेक पीडिता त्यामधून आयुष्यभर बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे वाढते बलात्काराचे गुन्हे आणि समाजातील त्याबद्दलचा रोष पाहता कायद्यातील नवी सुधारणा पाहता शक्ती मिल बलात्कार प्रकरणामध्ये फाशीची शिक्षाच 'शक्ती मिल बलात्कार' प्रकरणातील आरोपींना मिळावी अशी भूमिका राज्य आणि केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. नक्की वाचा: Shakti Act: महाराष्ट्रात आता बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा; नवीन कायद्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी.

मुंबई मध्ये 22 ऑगस्ट 2013 दिवशी संध्याकाळी एक महिला फोटोग्राफीसाठी महालक्ष्मी परिसरात गेली होती. तेथे 5 जणांकडून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.