संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | Twitter/AIR Pune News

मुंबई मध्ये आज (6 डिसेंबर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park)

अधिवासात 'जंगलाचा राजा' सिंह (Lion) प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात (Gujarat) मधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून (Sakkarbaug Zoological Park) मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश होणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांना आणि पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सिंह सफारी अनुभवता येऊ शकते.

गुजरात मधून आणलेल्या या सिंहाच्या जोडीमध्ये एक नर आणि एक मादी आहे. आशियायी सिंहाची जोडी अवघ्या 2 वर्षांची आहे. भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत.

बोरिवली पूर्व परिसरामध्ये असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 12 हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात देखील वाढ झाली होती. पण केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी होत गेली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता दोन सिंह आल्याने पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान वाढणार आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (Central Zoo Authority) 31 ऑक्टोबर रोजी या वन्यजीवांच्या देवाणघेवाणीला मान्यता दिली आहे. सिंहांच्या बदल्यात, SGNP  प्रशासनाने वाघांची जोडी बजरंग (6 वर्षांची) आणि दुर्गा (3 वर्षांची) सक्करबाग प्राणी उद्यानात पाठवली आहे.

मुंबई राणीच्या बागेतही अनेक वन्यजीव पहायला मिळतात. राणीच्या बागेचं प्रमुख आकर्षण हे येथील पेंग्विन्स आहेत. यंदा वर्षभरामध्ये येथे 3 नव्या पेंग्विन्सने जन्म घेतला आहे.