पुणे पोलिसांनी (Pune Police) तातडीने कारवाई करत एका नृत्य शिक्षकास अटक (Dance Teacher Arrested) केली आहे. त्याच्यावर 11 वर्षांच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडितांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने हा प्रकार केल्याचे समजते. हा प्रकार पुण्यालगतच्या वारजे माळवाडी भागातील नामांकीत शाळेत घडल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून सध्या त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. आरोपीने आतापर्यंत किती मुलांवर अत्याचार केला याबाबत निश्चित माहिती नसली तरी, सखोल चौकशीनंतर बरीच माहिती पुढे येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपीवर आतारपर्यंत दोन गुन्हे दाखल आहेत.
मोबाईल चित्रिकरण दाखवून अत्याचार
पीडित मुलाने शिक्षकाबाबत आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार मंगळवारी (17 डिसेंबर) उघडकीस आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपीचा तपास सुरु केला. दरम्यान, त्याला अटकही झाली. आरोपी शैक्षणीक संस्थेमध्ये नृत्य शिक्षक म्हणून नोकरी करतो. तो इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांतील विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देतो. आरोपीने मुलांसोबत लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. वर्गातील पीडित मुलगा आणि इतरही विद्यार्थ्यांच्या अज्ञानामुळे असलेल्या असहायतेचा फायदा घेतो. त्यांच्यावर अत्याचार करतो, गैरवर्तन करतो. तो इतक्यावरच थांबत नाही तर सदर घटनेचे मोबाईल चित्रिकरण करुन तो मुलांना पुन्हा पुन्हा दाखवतो आणि अत्याचार करत राहतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर आणखी कडक कारवाई केली जावी अशी पालकांची मागणी आहे. (हेही वाचा, Pune Crime: हरवलेली मांजर शोधण्याच्या बदल्यात महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी; पुणे येथील धक्कादायक प्रकार)
'गुड टच व बॅड टच'मुळे पीडिताला जाणीव
शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यंना गुड टच व बॅड टच शिकवला जातो. त्यातून मुलांना आलेल्या जागृतीमधून आपल्योबत चुकीचा प्रकार घडल्याची जाणीव पीडिताला झाली. त्यामुळे पीडिताने घडला प्रकार आपल्या पालकांकडे कथन केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, बसलेल्या धक्कातून विद्यार्थ्यांना सावरण्यासाठी शाळा प्रशासनाने समुपदेशकाची नियुक्ती केल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारी त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या वेळी पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, आरोपीने केलेले कृत्य अक्षम्य आहे. त्याने या आधी अशा काही घटना केल्या आहेत का, यासाठी पीडितांना विश्वासात घेऊन तपास करायचा आहे. शिवाय, आरोपीकडून इतरही अज्ञात गुन्ह्यांची उकल करायची आहे, त्यामुळे त्यास पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांचा युक्तीवाद ऐकून कोर्टाने आरोपीस 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.