Sextortion in Maharashtra: सहकारी बँकेच्या निवृत्त सीईओला ब्लॅकमेल (Blackmail) करून तब्बल 4.39 कोटी रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली आहे. या प्रकरणी ठाण्यातील (Thane) 45 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने 66 वर्षीय पिडीत व्यक्तीला पैसे न दिल्यास त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिली होती. तसेच त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला जाईल, असेही सांगितले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पिडीत व्यक्ती नवी मुंबईचा रहिवासी आहे. 2016 मध्ये महिला बँकेच्या वडाळा शाखेत आली होती, त्यावेळी त्याची महिलेशी भेट झाली.
ठाणे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अहवालानुसार, महिलेने सेवानिवृत्त सीईओशी आपल्या कर्जाबाबत संपर्क साधला होता. तिला कर्जाची गरज होती, मात्र कर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. कर्जासंबंधीची कागदपत्रे पाहण्यासाठी निवृत्त सीईओ 2017 मध्ये पहिल्यांदा महिलेच्या घरी आले होते. त्यावेळी महिलेने त्यांना आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. यानंतर महिलेसाठी 7,300 रुपयांच्या मासिक ईएमआयसह 3 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
कर्ज मंजूर झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात महिलेने पिडीत व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने व्हॉट्सॲपवर त्याचे काही प्रायव्हेट फोटो पाठवले आणि धमकी दिली की, जर त्याने 8 कोटी रुपये दिले नाहीत तर हे फोटो ती त्याच्या कुटुंबियांना पाठवेल. या दबावाखाली पिडीत व्यक्तीने महिलेला 2017 ते 2023 पर्यंत, 108 हप्त्यांमध्ये एकूण 4.39 कोटी रुपये दिले. पीडितेने आपला फ्लॅट विकून पैसे महिलेला दिले होते. (हेही वाचा: Pimpri Chinchwad Crime: बायकोचे अपहरण करुन दिली भूल, वाहनात ठेवले डांबून; पती आणि सासूविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल)
एवढे पैसे देऊनही महिलेचे ब्लॅकमेलिंग थांबले नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून बँकेच्या निवृत्त सीईओंनी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी महिलेला सापळा रचून पकडले. महिलेला अटक केल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सेवानिवृत्त सीईओकडून पैसे घेऊन महिलेने पैशाचे काय केले? या प्रकरणात महिलेशिवाय अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास सुरु आहे.