'पश्चिम रेल्वे'च्या लोकल मध्ये सापडले सात दिवसांचे बाळ, पालकांचा शोध सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You Tube)

पश्चिम रेल्वे (Western Railway) लोकलच्या मोटरमॅन केबिनमध्ये एक सात दिवसांचे नवजात बाळ कपड्याच्या पिशवीत टाकून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा चर्चगेट (Chuchgate) वरून सुटलेली ही लोकल भाईंदरच्या (Bhaynder) दिशेने जात होती. लोकल दादर (Dadar) स्थानकात दाखल होताच एका अज्ञात व्यक्तीने दादर स्थानकातील आरपीएफच्या कार्यलयात कॉल करून आपल्याला मोटरमॅनच्या केबिनमध्ये एक संशयास्पद कापडी पिशवी आढळली असल्याची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करताच या पिशवीत चक्क सात दिवसांचे बाळ सापडले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साधारण दोन वाजताच्या सुमारास आरपीएफच्या दादर स्थानकात फ्लॅटफॉर्मवर गस्त घालत असलेले आरपीएफ जवान रामवतार गुर्जर आणि लखन लाल सैनी यांना हे बाळ सापडले त्यांनतर बाळाला स्टेशनमास्तरांच्या कार्यालयात नेण्यात आले व तिथून अधिकारी त्याला सायन रुग्णायालयात घेऊन गेले. कापडाच्या पिशवीत शांतपणे झोपलेल्या या बाळाला पाहून सर्वचजण चिंतेत पडले होते मात्र सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाला कोणत्याही प्रकारच्या व्याधी नसून बाळाची तब्येत सुदृढ आहे असे कळल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. धक्कादायक! मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी परत येताना टॅक्सीमध्येच विसरले बाळ; पालकांचा हलगर्जीपणा

दरम्यान अज्ञात व्यक्तीचा कॉल आणि आरपीएफ जवानांची तातडीची मदत मिळाल्याने या बाळाचे प्राण वाचले असून सध्या सायन रुग्णालयात हे बाळ सुखरूप असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र  या बाळाचे आई वडील कोण आहेत? या बाळाला नेमके कोणत्या स्थानकावरुन ट्रेनमध्ये ठेवण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना सापडले नाहीये, याबाबत तपास सुरु असून बाळाला उघड्यावर टाकून देणाऱ्या आई वडिलांच्या विरोधात कलम 317 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.