MP Mohan Delkar Suicide Case: मुंबई पोलिसांना धक्का, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द
Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

दादरा नगर हवेली (Dadra And Nagar Haveli) मतदारसंघातील तत्कालीन खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) आत्महत्या प्रकरणात (MP Mohan Delkar Suicide Case) मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह सर्व नऊ आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.

प्रफुल्ल खोडा पटेल आणि इतर आठ जणांविरोधात मुंबई पोलिसांनी मार्च 2021 मध्ये डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा, Dadra & Nagar Haveli Bypoll: दादरा-नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांचा 47,000 मतांनी दणदणीत विजय; भाजप, काँग्रेस धक्क्याला)

दादरा आणि नगर हवेली (DNH) चे सातवेळा खासदार असलेले 58 वर्षीय डेलकर 22 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणात नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या नऊ आरोपींनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे हे लक्षात घेऊन एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली होती.

न्यायमूर्ती पी बी वराळे आणि न्यायमूर्ती एस डी कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकांना परवानगी देताना सांगितले की, याचिकांमध्ये योग्यता आढळली आणि कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी हा खटला रद्द करणे योग्य आहे.

डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी 9 मार्च 2021रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला होता.